Pune News : ग्रोथ हब द्वारे पुणे होणार उत्पादन केंद्र! आर्थिक उन्नती आराखडा तयार करण्याचे काम सुरू
Pune News : पुणे महानगर प्रदेशाचा आर्थिक बृहत् आराखडा अंतिम टप्प्यात; पीएमआरडीएकडून दोन महिन्यांत प्राथमिक अहवाल सादर होणार.

Pune News – केंद्र आणि राज्य सरकारने ग्रोथ हबच्या माध्यमातून मुंबईच्या धर्तीवर पुण्याचा कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे. ग्रोथ हब म्हणून पुणे महानगर प्रदेशाचा विकास करण्यासाठी आर्थिक बृहत् आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन महिन्यांत हा आराखडा तयार होईल.
पुण्याची सध्याची ५८ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन आहे. पुणे केवळ शिक्षणाचे माहेरघर न राहता, आशियातील एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.केंद्र शासनाच्या नीती आयोगाने देशातील निवडक शहरांसाठी आर्थिक विकासाचे धोरण तयार करण्यासाठी ग्रोथ हब ही संकल्पना सुरू केली आहे.
मुंबई, नागपूर आणि पुणे शहराचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात ग्रोथ हब साठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करताना त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश केला आहे. त्यामुळे पुणे महानगरच्या विकासाला बुस्टर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
राज्य शासनाने पुणे महानगर ग्रोथ हब करण्याच्या दृष्टीने सप्टेंबर २०२५ मध्ये पुणे महानगर प्रदेशासाठी आर्थिक बृहत् आराखडा तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देत अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्त केली आहे.
तसेच, या आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ग्रोथ हब कार्यकारी समिती स्थापन केली आहे.मुंबई महानगर प्रदेशासाठी देशातील पहिला आर्थिक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुणे महानगर प्रदेशासाठी हा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्य समितीच्या आतापर्यंत चार ते पाच बैठका झाल्या आहेत. उद्योजक, सहकारी संस्था, डॉक्टर, वास्तुविशारद अशा विविध क्षेत्रातील तंज्ञांच्या बैठका घेण्याचे काम या सल्लागार कंपनीकडून सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत यासंदर्भातील प्राथमिक अहवाल सादर होईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
शहराच्या अर्थव्यवस्थेला गती…
ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याची सध्याची 58 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याचे नियोजन आहे. पुण्यात उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी संशोधन, शैक्षणिक सुविधा, कृषीआधारित उद्योग, छोटे आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्र अशी पुण्याची शक्तीस्थळे आहेत. हे शहर जागतिक शहर बनावे यादृष्टीने आराखड्याद्वारे अर्थव्यवस्थेला गती दिली जाणार आहे.






