Pune News | पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला जबरदस्त प्रतिसाद

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे- नागपूर- पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस दि. १० ऑगस्टपासून सुरू झाली आणि प्रवाशांना जलद आणि आरामदायी सेवा मिळण्यास मदत झाली. पुणे- नागपूर १५ ते १६ तास लागणारा प्रवास आता १२ तासांत होत असल्यामुळे या वंदेभारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दि. २० ऑगस्टपर्यंत वंदे भारतच्या आठ फेऱ्यांतून ४ हजार ९६५ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
शिक्षण, नोकरी, व्यावसायानिमित्त पुण्यात आलेले, तसेच नागपूर येथे गेलेल्या व्यक्तींसाठी पुणे-नागपूर-पुणे वंदेभारत एक्सप्रेस सोयीची ठरत आहे. नागपूरला जायचे म्हटले तर रेल्वे फुल्ल, खासगी वाहनांचे अव्वाच्या सव्वा तिकीट दर, त्यात प्रवास असुरक्षित. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेला कायम गर्दी असते. नागपूर विभागातून पुणे शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (दि. १०) ऑगस्टपासून सुरू झाली. तिकीट दर जास्त असले, तरी रेल्वेंची संख्या कमी आणि प्रवासी संख्या जास्त आहे.
वंदे भारत एक्सप्रेस अन्य रेल्वेंच्या तुलनेत ३ तास आधीच पोहोचते. त्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला आठ डबे असून, ६२० प्रवाशांची क्षमता आहे. दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत या जवळपास ५ हजार नागरिक यातून प्रवास केला आहे. यामुळे रेल्वे आणि प्रवासी या दोघांचाही फायदा होत आहे.
६८ लाख रुपयांचे उत्पन्न..
आता गणपती, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी सण येऊ घातले आहे. त्यामुळे रेल्वेचे बुकिंग लवकर फुल्ल होत असून, रेल्वेला गर्दी वाढत आहे. आता नागपूरकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध झाल्यामुळे आणि प्रवाशांची पसंतीही मिळत असल्याने वंदे भारतला भाविष्यात डबे वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. दरम्यान, मागील दहा दिवसांत एकूण आठ फेऱ्यांमधून रेल्वेला जवळपास ६८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.




