Pune News | गणेशोत्सवाच्या गर्दीने शहर गजबजले ; देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची एकच झुंबड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी साकारलेले देखावे हे देशभरातील भाविकांचे आकर्षण असते. पावसाळी वातावरण आणि हलक्या सरीतही विसर्जनापूर्वी मिळालेल्या शनिवारच्या सुटीचा फायदा घेत पुणेकर रस्त्यावर उतरले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांचीही भर पडल्याने गर्दीने कळस गाठला होता.
मध्यवस्तीतील बहुतांश रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलले होते. सायंकाळनंतर रात्र जसजशी उतरत गेली तसतशी गर्दीत भर पडत गेल्यामुळे रस्त्यांनाच जणू पाय फुटले होते. हडपसर, कात्रज-धनकवडी, कोथरूड, वडगावशेरीसह विविध उपनगरातही नागरिकांची गर्दी उसळली होती.यंदाही गणेश मंडळांनी भव्य-दिव्य देखाव्यांची परंपरा राखली आहे.
त्यामुळे ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक, धार्मिक आणि काल्पनिक देखाव्यांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत देखावे खुले असल्याने आणि उद्या, रविवारी घरोघर गौराईचे आगमन होणार असल्याने गर्दीने उच्चांक केला होता. गौराई विसर्जनापर्यंत अनेकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे पुणेकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. सकाळपासूनच गर्दी पहायला मिळत होती.
दुपारनंतर गर्दीत भर पडली आणि रात्री तर रस्त्यावरून चालणेही अवघड होते. मंडळांचे देखावे पाहण्यांसाठी रांगा लागल्या होत्या. मध्यवस्तीतील प्रत्येक रस्त्यावर इंचभर पुढे सरकण्यासाठी कसरत करावी लागत होती. वाढलेल्या गर्दीमुळे अनेकांनी नदीपात्रात वाहने लावून पायी चालणेच पसंत केले. ज्यांनी मध्य वस्तीतील रस्त्यांवर वाहने आणली, त्यांना मात्र कासव गतीने पुढे सरकावे लागले.
प्रचंड गर्दीमुळे पायी चालणार्यांनाही काळजी घेऊन चालावे लागले. मध्य वस्तीतील हत्ती गणपती, राजाराम मित्र मंडळ, नवजवान मित्र मंडळ, शनिवार सार्वजनिक गणेश मंडळ, निंबाळकर तालिम मंडळ, नागनाथ पार, माती गणपती, भरत मित्र मंडळ आदी मंडळांचे देखावे पाहण्यासाठी लोकानी पसंती दिली. तसेच विद्युत रोषणाई, पौराणिक देखावे पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
यंदा मंडळांनी लवकर देखावे खुले केले आहेत.ऐतिहासिक देखावे पाहण्यास तरूणाईकडून शिट्टी वाजवून, ओरडून प्रतिसाद देण्यात येत होता. कुटुंबियांकडून पौराणिक देखावे, विविध मंदिराच्या उभारलेल्या प्रतिकृती पाहण्यास पसंती दिली जात होती. एकूणच अबालवृद्धांनी देखावे पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
पीएमपी, मेट्रोला गर्दी..
उपनगरासह पिंपरी चिंचवड, जिल्ह्यातून लोक शहरात विशेषत: मध्यवस्तीत येत होते. सकाळपासून उपनगरातून शहरात येणाऱ्या पीएमपीमध्ये गर्दी होती. संध्याकाळी ती वाढत गेली. मेट्रो प्रवाशांची संख्याही मोठी होती. प्रवाशांच्या सोयीसाठी स्वारगेट ते जिल्हा न्यायालय येथे दर ३ मिनिटांनी मेट्रोसेवा सुरू आहे. सकाळी ६ वाजता सुरू झालेली मेट्रोची सेवा आता नागरिकांसाठी रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवली आहे.
चोख, कडक बंदोबस्त..
शनिवार, रविवारची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही दिवसांसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. मध्यवर्ती भागात जसजशी गर्दी वाढत जाईल, तसतसे बॅरिकेड लावून वाहनांसाठी रस्ते बंद करण्यात येत होते. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत होती.
मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दीच्या नियोजनासाठी मदत घेण्यात येत होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्यवस्तीत वॉच टॉवर, सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा लावली होती. व्हीआयपी व्यक्तीमुळे सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस होते.




