प्रभात वृत्तसेवा पुणे – अतिवृष्टीच्या आस्मानी संकटाने आणि फसव्या मदतीच्या सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारात सरसकट कर्जमाफीची घोषणा करून सत्तेत आलेल्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष)तर्फे करण्यात आला आहे. ऐन दिवाळीत संकटात सापडलेल्या बळीराजाचा आवाज बनून सरकारला जाब विचारण्यासाठी या पक्षातर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेधात्मक काळी दिवाळी साजरी करण्यात आली. या आंदोलनातून महायुती सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह माजी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, विजय कोलते, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, उदय महाले, वंदना मोडक, रमीज सय्यद, मनाली भिलारे, किशोर कांबळे, सुलक्षणा शीलवंत, मजहर मणियार, पंडित कांबळे, अमोल परदेशी, शेखर ढवळे, दीपाली कवडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.