Pune News : पदोन्नतीचे आदेश निघाले, पण रुजू करुन घेण्यात आडकाठी

पुणे – शालेय शिक्षण विभागाकडून अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी विलंब लावला जातो. त्यातही पदोन्नतीचे आदेश राज्य शासनाकडून जारी केलेले असताना संबंधित अधिकाऱ्यांना जाणिवपुर्वकपणे पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू करुन घेण्यात आडकाठी आणून अन्याय केला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झालेली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नत्या करताना अनेक भानगडी होतात. त्यात हेतुपुरस्सरपणे काही राजकारणही केले जाते. कर्तव्यकक्षता, प्रामाणिकपणाची दखल घेऊन योग्य अधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यालयात व पदावर बदली, पदोन्नती ही मिळालयाच हवी आहे. अधिकाऱ्यांमधील आपआपसातील वाद कोणत्या ना कोणत्या कारणाने उफाळून येत असतात. त्याचे विपरित पडसादही उमटतात.
शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे व हारुन आतार यांना सहसंचालकपदी पदोन्नती देण्याची फाईल अनेक महिने मंत्रालयात निर्णयाविना धुळखात पडली होती. औदुंबर उकीरडे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली होती. मॅटने पदोन्नतीचे आदेश काढण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मो.बा.ताशिलदार यांनी बुधवारी (दि. २३) पदोन्नतीचे लेखी आदेश जारी केले आहेत.
औदुबंर उकीरडे यांची पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी तर हारुन आतार यांची शिक्षण आयुक्तालयात सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आतार यांना तात्काळ पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू करुन घेण्यात आले. उकीरडे यांना मात्र अद्यापही रुजू करुन घेण्यात आलेले नाही. उकीरडे यांच्या सर्व चौकशा पुर्ण झालेल्या असतानाही त्यांना पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू करुन घेण्यात काहीतरी कारणे पुढे करुन आडकाठी आणली जात आहे. ही बाब अन्यायकारकच म्हणावी लागणार आहे.
अपर जिल्हाधिकाऱ्यांची वर्णी कुठे लागणार ?
महसुल विभागातील अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची शिक्षण विभागातील कोणत्या कार्यालयात वर्णी लागणार याबाबतही उत्सुकता निर्माण झालेली आहे. पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांच्याकडे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील उपायुक्त संजय राठोड यांच्याकडे शिक्षण आयुक्तालयातील अंदाज व नियोजनच्या शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.





