Pune News | हिंजवडीतील समस्या सोडवण्यास प्राधान्य

प्रभात वृत्तसेवा
पुणे – हिंजवडीसह चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या महिन्यापासून विविध प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात येत आहे. यात रस्ता रुंदीकरणासह अनधिकृत बांधकामे काढण्यात येत असल्याने रहदारी सुरळीत होण्यास मोठी मदत होत असल्याचा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केला आहे. तसेच हिंजवडी भागातील १९ किलोमीटर पर्यंतची अतिक्रमणे काढली असून या भागातील अरुंद रस्ते रुंद करत काही नवीन रस्ते प्रस्तावित केले आहे.
त्या अनुषंगाने तातडीने मोजणी, भूसंपादन प्रक्रियेचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही दिले आहेत.हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतूक कोंडीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने कार्यवाही सुरु आहे. अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढण्याची कारवाई पीएमआरडीएसह त्या- त्या स्थानिक यंत्रणांकडून सुरू आहे. त्या अनुषंगाने सुरु असलेली विकास कामे, कारवाईसंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. म्हसे यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणांकडून आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी लक्ष्मी चौक ते मेझा – ९ हॉटेल, पांडवनगर ते माणगाव ते फेज ३, लक्ष्मी चौक ते मारुंजी ते कोलते पाटील गेट, लक्ष्मी चौक ते पद्मभूषण चौक ते विप्रो सर्कल, मधुबन हॉटेल ते छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक ते एमआयडीसी हद्दीपर्यंत, कासारसाई रोड, छत्रपती शिवाजी चौक ते हिंजवडी गावठाण (स्मशानभूमी रोड), प्राइड रोड ते विप्रो सर्कल, शिवाजी चौक ते पद्मभूषण चौक यासह इतर भागातील रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली.
माण, हिंजवडी, मारुंजी आदी भागातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने पर्यायी रस्त्यांसंदर्भात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस जलसंपदा विभाग,एमआयडीसी, एमएसईबी, एमपीसीबी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





