Pune News : पोलीस हवालदाराने गळफास घेऊन जीवन संपवले

पुणे : वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. राजेंद्र विलास गायकवाड (४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती.
सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.





