Pune News | सीएचबी प्राध्यापकांना सात दिवसांत मानधन द्या ; उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या नियुक्ती मान्यतेचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याची गंभीर दखल उच्च शिक्षण संचालनालयाने घेतली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना असे प्रलंबित प्रस्ताव अवघ्या दोन दिवसांत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, विभागीय सहसंचालकांनी पुढील सात दिवसांत या प्राध्यापकांचे मानधन देण्याची करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असेही आदेश दिले आहेत. यामुळे हजारो प्राध्यापकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कामकाज सुरळीत चालावे, यासाठी शासनाने १७ ऑक्टोबर २०२२ च्या निर्णयानुसार सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित केली होती.
यामध्ये कार्यभार निश्चिती, जाहिरात, निवड प्रक्रिया आणि विद्यापीठाची मान्यता यांचा समावेश होता. मात्र, अनेक विद्यापीठांनी याचे पालन न केल्याने नियुक्ती मान्यतेचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत. विद्यापीठांची मान्यता नसल्याने महाविद्यालयांना मानधनाची प्रस्ताव सादर करता येत नाहीत. परिणामी, प्राध्यापकांना अनेक महिन्यांपासून मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत विविध संघटनांनी तक्रारी केल्यावर डॉ. देवळाणकर यांनी वरील आदेश दिले.
डॉ. देवळाणकर यांनी विद्यापीठांनी नियुक्ती मान्यतेचे प्रस्ताव दोन दिवसांत निकाली काढावेत, असे आदेश दिले आहे. उच्च शिक्षण सहसंचालकांनी विशेष शिबिरांचे आयोजन करून मानधनाचे प्रस्ताव स्वीकारावीत आणि सात दिवसांत प्राध्यापकांचे मानधन खात्यात जमा होईल, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.




