Pune News | शासकीय कामात अडथळा भोवला ; आरोपीस ८ वर्षे सक्तमजुरी

प्रभात वृत्तसेवा
बारामती – शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी अरुण धायगुडे यास एकूण ८ वर्षे सक्त मजुरी व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा बारामती जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश हितेंद्र अनिलकुमार वाणी यांनी सुनावली.
आरोपी अरूण गणपत धायगुडे (रा. धायगुडे वस्ती मोरगाव, ता. बारामती) यास शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व ५ हजार रुपये दंड व लोकसेवकास जीवे मारणेची धमकी दिल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व २ हजार रुपये दंड, शिवीगाळ केल्याने २ वर्षे सश्रम कारावामाची व २ हजार रुपये दंड, बेकायदेशीर रित्या कार्यालयात शिरकाव केल्याने २ वर्षे सश्रम कारावासाची व २ हजार रूपये दंड असे एकूण ८ वर्षे सश्रम कारावास व ११ हजार रुपये दंड व शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
(दि.१८) जुलै २०१३ रोजी आरोपीने फिर्यादी सुनील सुब्राव महाडीक (कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी शाखा मोरगाव) शाखेमध्ये काम करताना आरोपी गणपत अरूण धायगुडे याने कार्यालयात घुसुन आरोपीस शिवीगाळ करूण दमदाटी करून फिर्यादी व साक्षीदार यांना धमकी दिली.
मारहाणप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली. तपास तात्कालीन अनिल विठठल ओमासे पीएसआय यांनी केला. तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, प्रत्यक्ष साक्षीदार व महावितरण कंपनीचे तपासी अधिकारी, अशा एकूण पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले. केसमध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल शिक्षा केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कसपटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. हवलदार भागवत पाटील यांनी सहकार्य केले.





