Pune News : पगार नाही, बोनसही नाही! क्रिस्टल कंपनीच्या मनमानीमुळे महापालिका सुरक्षारक्षकांची दिवाळी अंधारात

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिकेच्या सेवेत कंत्राटी पध्दतीने भरलेल्या परिमंडळ तीनमधील १०० कर्मचाऱ्यांना दिवाळी सुरू झाली तरी अद्याप वेतन मिळालेले नाही तसेच, बोनस देण्यासही ठेकेदार टाळाटाळ करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेच्या सुरक्षा विभागाकडून वारंवार सूचना देवूनही हे सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या क्रिस्टल कंपनीकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आली आहे.
महापालिकेची कार्यालये, मिळकती, उद्याने, स्मशानभूमी, मैदाने, जलशुध्दीकरण केंद्र अशा ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. या सुरक्षा रक्षकांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन देणे बंधनकारक आहे तसेच आयुक्तांच्या नवीन आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एकवट १० हजार रूपये बोनस देण्याच्या सूचना आहेत. हे सुरक्षा रक्षक नेमण्याचे काम काम तीन कंपन्यांना विभागून दिले असून या कामात १६५ सुरक्षा रक्षक क्रिस्टल कंपनीने पुरवले आहेत.
परिमंडळ तीनमधील क्षेत्रीय कार्यालयाकडे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यातील १०० सुरक्षा रक्षकांना वेतन देण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर उजाडला तरी ६५ कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही तर दुसरीकडे १६५ मधील कोणत्याही कर्मचाऱ्याला बोनस दिलेला नाही. त्यामुळे दिवाळीचा दुसरा दिवस उजाडला तरी या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. त्यांना उसने पैसे घेवून सण साजरा करावा लागणार आहे.
“तीनही कंपन्यांनी दिवाळीपूर्वी वेतन तसेच बोनस देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यातील दोन कंपन्यांनी पैसे दिले असून क्रिस्टल कंपनीने अद्याप पैसे दिलेले नाहीत. त्यांना दोन दिवसांपासून वारंवार सूचना देण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद दिला जात नाही. याबाबत महापालिका आयुक्तांना कल्पना देवून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.”
– राकेश विटकर ( मुख्य सुरक्षा अधिकारी, महापालिका)





