प्रभात वृत्तसेवा पुणे – देशातील साडेपाच हजार धरणांपैकी निम्मी धरणे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्यकाळात उभारली गेली आहेत. स्वातंत्र्यलढ्यात नेहरू- गांधी घराण्याचे मोठे योगदान असून, सध्याचे सत्ताधारी त्यांच्या कार्याचा इतिहास पुसण्याचे काम करीत आहेत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली.शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार आणि ज्येष्ठ नेते अॅड. अभय छाजेड, सुनील शिंदे, अजित दरेकर, यासीन शेख, सचिन आडेकर, आबा जगताप, विठ्ठल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उल्हास पवार म्हणाले, इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने आयर्न लेडी होत्या. पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. सिक्किमला भारतात विलीन करून त्यांनी देशाचे सार्वभौमत्व दृढ केले. त्यांचे नेतृत्व आणि धैर्य जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देणारे ठरले.प्रास्ताविक अॅड. अभय छाजेड यांनी केले, अक्षय जैन यांनी आभार मानले.