विश्रांतवाडी : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विविध मतदारसंघात महायुतीमधील धुसफूस समोर येताना दिसत आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) महायुतीमधून बाहेर काढावे, अशी मागणीही भाजपमधले कार्यकर्ते उघडपणे करत आहेत. त्याचीच प्रचिती वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांना आज (दि.४)आली. भाजपच्यावतीने मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून मुंडे यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंडे यांना महायुतीमधील “राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी” सुर ऐकावा लागला. भारतीय जनता पार्टीच्या वडगावशेरी मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी मुंडे यांनी सवांद साधला. त्यांच्या समोर अनेकांनी महायुती मधील खदखद बोलून दाखवली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, योगेश मुळीक, राहुल भंडारे, मारुती सांगडे, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, उपाध्यक्ष संतोष खांदवे, महेंद्र गलांडे, संतोष राजगुरू, मंगेश गोळे, स्वप्नील चव्हाण, संदीप दहीफळे, राजू बाफना, ऍड.राजू केशरकर, महेश गलांडे, लिंगू साखरे, सुभाष चव्हाण, जितेंद्र जगताप,अरविंद गोरे, चंद्रकांत जंजिरे,विजय चौगुले यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे यांनी युती धर्म पाळला नाही. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार न करता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत होईल असेच काम केले.त्यांनी प्रामाणिक काम केले असते तर भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य आणखीन वाढले असते. जर आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला गेली. तर भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारास सहकार्य करणार नाही, असे लेखी पत्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे वडगावशेरी मतदार संघाचे भाजपा अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी दिले आहे.तसेच माजी नगरसेवक अनिल(बॉबी) टिंगरे यांनी देखील विद्यमान आमदार युती धर्म पाळत नाहीत,असा आरोप केला. त्याचबरोबर महापालिकेच्या कामांचे श्रेय घेत असल्याचा आरोप मुंडे यांच्या समोर केला. याबाबत पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, मतदार संघात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. त्यामुळे सहाजिक हा मतदार संघ भाजपला जावा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांनी ती आपल्या समोर मांडली आहे. मात्र जागा वाटपाचा निर्णय वरीष्ठ घेतील असे त्यांनी सांगीतले.भाजप मधील माजी आमदार, माजी नगरसेवक बैठकीला अनुपस्थितीत असल्याबाबत मुंढे यांना विचारणा केली असता पुढील बैठकीला ते उपस्थित राहतील असे उत्तर दिले. त्यानी नारायण राणे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाचे व आरक्षण विरोधाचे फेक नरेटिव्ह सेट केले होते. परंतु या निवडणुकीत फेक नरेटिव्ह चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानीक पातळीवर लोकांशी संपर्क साधून विश्वास दिला पाहिजे. महायुतीने लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.महायुती सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत,अशा सूचना आमदार पंकजा मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. बैठकीचे सुत्रसंचालन संतोष घोलप यांनी तर आभार संतोष राजगुरू यांनी मानले. मागील महिन्यात वडगावशेरी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. यावेळी देखील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आमदार टिंगरे हे युती धर्म पाळत नसल्याची टीका केली होती. आता तर पक्षाच्या निरीक्षक मुंडे यांनाच आमदार सुनील टिंगरे यांचे काम करणार नसल्याबाबतचे पत्र मतदारसंघाच्या अध्यक्षांनीच दिले आहे. त्यामुळे महायुतीतील धुसपुस वाढत चालली असल्याचे दिसते. ही धुसपुस व संघर्ष वाढतच जाणार की कमी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश येणार हे आगामी काळात पहायला मिळेल.