Pune News | नागपूर, कोल्हापूर एक्स्प्रेसला चार जनरल डब्यांची वाढ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे-नागपूर आणि कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसला प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्यांना प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार येत्या ५ सप्टेंबर २०२५ पासून चार जनरल डबे वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.पुण्यातून विदर्भात जाणारी दैनंदिन प्रवासी संख्या अधिक आहे. तसेच, या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेंची संख्या तुलनेने कमी आहे.
त्यामुळे रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यावर प्रवाशांना खासगी बसमधून प्रवास करावा लागतो. पुणे ते नागपूरदरम्यान रेल्वे तिकीट जनरल १६०, स्लीपर ३८० रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी वारंवार मागणी होत होती. त्याला आता पूर्णत्व आल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.




