Pune News: ‘माझी वाघोली माझा अभिमान..!’; वाघोलीच्या समस्या वेधणारा ‘रन फॉर वाघोली’ अभिनव उपक्रम

वाघोली – ‘माझी वाघोली माझा अभिमान..’ हा संकल्प बाळगून वाघोलीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राव लक्ष्मी फाउंडेशन आयोजित रन फॉर वाघोली’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत असून 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या उपक्रमात वाघोलीतील अनेक नागरिक सहभागी होणार असल्याने वाघोलीतील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा हा एक प्रयोग आहे.
वाघोली मधील पिण्याचे पाणी, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, क्रीडांगणे वाहतूक कोंडी, लहान थोर सर्वांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मनपा प्रशासन व महाराष्ट्र शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी रन फॉर वाघोली हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून या उपक्रमात धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर धावणार असून या माध्यमातून वाघोली करांच्या प्रश्नाला शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून वाचा फोडली जाणार असून नागरिक या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊ लागले असून या मोहिमेची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्राच्या विधानसभा पटलावर अनेक वेळा लक्षवेधी मांडून वाघोलीकरांसाठी आणि वाघोलीकर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न केल्याने रन फॉर वाघोली हा उपक्रम वाघोलीकरांची बाजू पुणे महानगरपालिकेकडे पोहोचवण्यासाठी उपयुक्त असल्याचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन वाघोलीकर यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले आहे.





