Pune News : संगीत म्हणजे ‘आत्म्याला घातलेली साद’

पुणे – संगीत म्हणजे एकप्रकारे ईश्वराची साधना असून ती आत्म्याला घातलेली निर्मळ साद असते. ताणतणाव आणि स्पर्धेच्या आजच्या काळात उत्तम कलाकार घडवणे ही काळाची आवश्यकता बनली आहे. कला हीच मनुष्याला तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करते. अलीकडे तर संगीताचा उपयोग उपचारांमध्ये देखील होऊ लागला आहे. त्याला ‘म्युझिक थेरपी’ असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीताने आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आहे. अशा कलेचे जतन करणे हे संगीत विद्यालयांचे मोठे काम असून समाजाने कलाकारांना यथोचित सन्मान द्यायला हवा, असे प्रतिपादन अभिनेते संजीव मेहेंदळे यांनी केले.
ते रागेश्री संगीत विद्यालयाच्यावतीने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या २१ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. गायत्री गोखले, सचिन गोखले, लक्ष्मण मोरे यावेळी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात ५ वर्षांच्या बालकापासून ते ८८ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध गटांमध्ये सामूहिक गीतगायन झाले. प्रत्येक गटाला श्रीदेवी, सुधीर मोघे, बाबूजी, कविता कृष्णमूर्ती, गीता दत्त, राजेश खन्ना, मन्ना डे अशी वेगवेगळी नावे देण्यात आली होती. विशेष वेशभूषेमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला.
कार्यक्रमाला सचिन गोखले, अभिजित पानवलकर (तबला), गायत्री गोखले (संवादिनी), संतोष कुलकर्णी (सिंथेसायझर) यांची साथसंगत मिळाली. भाग्यदा गोखले, उन्मेष मोरे, जयंती शेट्टी, दीपक कुलकर्णी यांनीही सहभाग घेतला.
प्रेक्षकांनी सर्व कलाकारांच्या सादरीकरणांना उत्स्फूर्त दाद दिली. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंजुषा खेडकर, श्वेता मोरे, गीता ठकार, अपर्णा देशपांडे यांनी केले, तर भाग्यदा गोखले यांनी आभार मानले.





