Pune News : जुन्या भांडणातून लोखंडी रॉड मारून केला खून; एकाला जन्मठेप

पुणे – जुन्या भांडणाच्या कारणावरून झोपलेल्या तरूणाच्या डोक्यात मशिनचा जड लोखंडी रॉड मारून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला १ महिना अतिरिक्त करावास भोगावा लागेल. तर दंड भरल्यास ती रक्कम मयताच्या आईला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुरज सुनील फाळके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अमोल सुरज खडके (वय २२, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्या खून प्रकरणी त्याच्या आईने कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे आणि उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक महेश जगताप व हवालदार विजय माने यांनी मदत केली. ही घटना कोंढवा येथील एका कंपनीत २६ अॉक्टोबर २०२१ रोजी घडली. फाळके आणि खडके कोंढवा भागातील एकाच कंपनीत कामाला होते. खडके यानेच फाळके याला कामाला लावले होते.
मात्र, फाळके सतत कामाला दांड्या मारायचा. याबाबत खडके याला मालकाला सांगून कामावरून काढून टाकेन, अशी धमकी दिली होत. काही काळासाठी कामावरून काढूनही टाकले होते. याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने निकाल दिला.





