प्रभात वृत्तसेवा पुणे – दिवाळीसाठी एकरकमी बोनस मिळण्याच्या आशेवर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनससाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. महापालिकेकडून नियमांचे कारण पुढे करीत या कर्मचाऱ्यांना एकरकमी बोनस देण्याऐवजी ९ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस, रजा वेतन आणि घरभाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ही रक्कम त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतनात वाढ करून दिली जाणार आहे. या वाढीव वेतनासाठी महापालिका प्रशासनाने ४५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. यामध्ये आरोग्य, घनकचरा आणि सुरक्षा विभागात सर्वाधिक कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांकडून बोनसची मागणी होत आहे. त्यामुळे यावेळी महापालिका आयुक्त यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी कामगारांना रजा वेतन आणि घरभाडे मिळणार आहे. त्यानुसार, महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कुशल कामगारांना रजा वेतन आणि घरभाडे मिळणार आहे. ज्यांचा पगार २१ हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांना बोनस मिळणार नाही. कुशल कामगारांच्या वेतनात महिन्याला २ हजार ३१० रुपयांची वाढ होणार आहे, तर अकुशल कामगारांच्या पगारात ३ हजार ७७५ रुपयांची वाढ होईल. यामध्ये बोनस, घरभाडे आणि रजा वेतन यांचा समावेश असणार आहे. आता ठेकेदारांच्या कोर्टात चेंडू.. सण, उत्सवाच्या कालावधीत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकरकमी पैशांची गरज असते. मात्र, आता महापालिकेने त्यांच्या वेतनातच बोनस, घरभाडे आणि रजा वेतन यांचा समावेश केला आहे. ही रक्कम महापालिका ठेकेदाराला देणार असून, ती त्याच्याकडून कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. आधीच अनेक ठेकेदार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून अडीच ते तीन हजारांची रक्कम उचल दाखवून कापून घेतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सणांच्या काळात ठेकेदाराकडे हात पसरावे लागतात. अशा स्थितीत ठेकेदार ही रक्कम कर्मचाऱ्यांना एकरकमी देणार की वर्षभरानंतर, याची जबाबदारी ठेकेदारावर देण्यात आली आहे. अनेक ठेकेदारांकडे ११ महिने किंवा सहा महिन्यांची कामकाज मुदत असते. त्यानंतर ठेकेदार बदलले जातात. याचा गैरफायदा घेत ठेकेदार ही रक्कम कामगारांना देत नाहीत. त्यामुळे ही वाढीव रक्कम ठेकेदारांकडून लाटली जाण्याची शक्यता असून, महापालिकेकडून त्यासाठी कोणतेही नियम घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खरंच ही रक्कम कामगारांना मिळणार की ठेकेदार लाटणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदा दिवाळी जुन्या वेतनातच.. कंत्राटी कामगारांना यंदाची दिवाळी जुन्या वेतनातच काढावी लागणार आहे. महापालिकेकडून देण्यात येणारी वेतनवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन नोव्हेंबर महिन्याच्या पगारात मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांना विद्यमान वेतनातच काढावी लागणार आहे. प्रत्यक्षात महापालिकेच्या घोषणेनंतर एकरकमी बोनस मिळाल्यास अडचणी कमी होतील, अशी कर्मचाऱ्यांची भावना होती. मात्र, नियमातील अडचणींमुळे हा बोनस एकरकमी न देता प्रत्येक महिन्याच्या वेतनात देण्यात येणार आहे.