Pune News | महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती लवकरच! ; १६९ पदांसाठी जाहिरात पुढील आठवड्यात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदांसाठी नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. एकूण १६९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा घेणारी संस्था आयबीपीएसकडील काही तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाला आहे.याआधी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या २७,८७९ उमेदवारांपैकी वयोमर्यादा उलटून गेलेल्यांना देखील अर्ज करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला असून, त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत.
त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग दुरुस्त करण्याचीही संधी या उमेदवारांना देण्यात आली आहे. सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना १२ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या संधीचा ४,४१९ उमेदवारांनी लाभ घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले. सुरुवातीला ३० ऑगस्टपर्यंत असलेली मुदत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वाढविण्यात आली होती. आता पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.





