pune news : मनसेचा महापालिकेवर हांडामोर्चा; एक दिवस पाणीबंद रद्द करण्याची मागणी

पुणे : महापालिकेकडून शहरात प्रत्येक गुरूवारी पाणीबंद ठेवला जात आहे. मात्र, त्यामुळे, पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असून पाण्यावाचून पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे हा पाणीबंद रद्द करून शहरात पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिके समोर जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात मोठया संख्येने महिला पाण्याचे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.
मनसे नेते राजेंद्र वागसकर शहर अध्यक्ष साईनाथ बाबर सरचिटणीस किशोर शिंद,े बाळा शेडगे, रणजीत शिरोळे हेमंत संभूस महिला शहर अध्यक्षा वनिता वागसकर यांच्यासह मनसेचे शहर पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांना निवेदन देण्यात आले तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
मनसे नेते वागसकर म्हणाले की, दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने मात्र, त्यानंतर दोन-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने पुणे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वारजे, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, वाघोली, ओंध, बाणेर, पाषाण, कर्वेरोड, डेक्कन सर्व पेठा, पुणे कॅम्प या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पुणेकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दैनंदिन झाले आहे.
पुणे शहरातील सर्व भागातील पेठा उपनगरातील सर्व भागात अशीच परिस्थिती आहे.मात्र,त्याच वेळी टॅंकरने देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी कोणतीही टंचाई नाही. तर समान पाणी योजनेच्या कामातही अनियमितता असल्याची स्थिती असून केवळ पाण्याच्या नावाखाली कोटयावधीचा निधी लाटला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असून त्यावर उपाय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.




