Pune News | माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा? ; जिल्हा परिषदेच्या ५४ महिला कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेतील ५४ महिला कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी महिला व बालकल्याण विभागाने सादर केलेल्या अहवालानंतर दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकांनंतर उर्वरित अर्जांची छाननी केली असता, त्यात लाखो अर्ज अपात्र ठरवण्यात आले. जून महिन्यात योजनेच्या घेतलेल्या आढाव्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आले. याच तपासणी मोहिमेदरम्यान जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या ५४ महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.





