Pune News: दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर शिक्षकांच्या अंगलट! ४६ पैकी ३८ जण अडकले जाळ्यात..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर करून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचे बिंग अखेर फुटले आहे. चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आलेल्या ४६ शिक्षकांपैकी ३८ शिक्षकांनी आपण बदलीसाठी या प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याची कबुली दिली आहे. या सर्व शिक्षकांची बदली केली जाणार असून, त्यांच्यावर विभागीय चौकशीची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील ४०० हून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याच्या तक्रारी दिव्यांग संघटनांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी १७६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची आरोग्य उपसंचालकांमार्फत पडताळणी केली. या पडताळणीत संबंधित शिक्षकांचे अपंगत्व ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर जिल्हा परिषदेने ४६ शिक्षकांना नोटीस बजावून खुलासे मागवले होते. प्राप्त झालेल्या ४५ खुलाशांपैकी ३८ शिक्षकांनी बदलीसाठी या सवलतीचा वापर केल्याचे मान्य केले आहे, तर ४ शिक्षकांनी नियुक्तीपासूनच याचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने या प्रक्रियेदरम्यान पुरंदरमधील एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, ज्या ३८ शिक्षकांनी बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांची तत्काळ बदली करण्यात येईल. तसेच, या सर्व शिक्षकांविरोधात कडक विभागीय चौकशी केली जाणार आहे.





