Pune News | मेट्रो साइटचा राडारोडा टाकला उघड्यावर ; टाटा कन्स्ट्रक्शनला महापालिकेचा १५ लाखांचा दंड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बालेवाडी हायस्ट्रीटसमोरील मोकळ्या जागेत पीएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्ग क्रमांक ३ प्रकल्पातील उत्खननाचा राडारोडा अनधिकृतपणे टाकल्याचे उघड झाले आहे. या प्रकारावर महापालिकेने टाटा कन्स्ट्रक्शन यार्डला थेट १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन दिवसांत दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या पाहणीत, राडारोडा टाकताना दोन डंपर वाहने महापालिकेच्या पथकाने पकडली. तब्बल ५० ते ७० ट्रक राडारोडा बेकायदेशीरपणे टाकल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या परिपत्रकानुसार प्रतिट्रक २५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, ६० वाहनांसाठी १५ लाख रुपये दंडाची नोटीस महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी बजाविली आहे. त्यानुसार दोन दिवसांच्या आत दंड भरावा, तसेच टाकलेला राडारोडा उचलावा; अन्यथा महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. बालेवाडीत मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली चालणारी ही बेकायदेशीर मनमानी सहन केली जाणार नाही, असा कडक इशाराही महापालिकेने दिला आहे.
“शहरात कोणत्याही प्रकारचे काम सुरू असले, तरी त्याचा राडारोडा अथवा इतर कचरा मोकळ्या जागा, मैदानांवर टाकणे योग्य नाही. राडारोड्यासाठी महापालिकेने प्रकल्प उभारलेला आहे. तिथे तो देणे अपेक्षित आहे. उघड्यावर राडारोडा टाकल्याने ही कारवाई केली असून, सर्व विभागांना अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
– नवल किशोर राम (महापालिका आयुक्त)





