प्रभात वृत्तसेवा पुणे – मेट्रोतील कंत्राटी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाने (आरएसएस) शनिवारी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकासमोर निदर्शने केली. आम्ही महामेट्रो आस्थापना आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो, मात्र, आमच्या सुरक्षितेतच काय? असा प्रश्न महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी महामेट्रोच्या प्रशासनाला यावेळी विचारला. यावेळी स्टेशन इन्चार्ज, ट्रेन ऑपरेटर, टेक्निशियन, सुरक्षारक्षक, ऑफिस असिस्टंट, शिपाई आणि साफसफाई कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या मेट्रो कर्मचाऱ्यांनी निदर्शनात सहभाग घेतला होता. महामेट्रोच्या कामगारांना रेल्वे कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सुविधा मिळाव्या तसेच सुरक्षित व महामेट्रो प्रशासनाकडून सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे यांनी यावेळी केली. तसेच पुणे महामेट्रोच्या कामगारांना रात्री शिफ्ट कामासाठी ओव्हरटाइम मिळाला पाहिजे, आणि सुरक्षारक्षक, टॉम/सीएफए, साफसफाई कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळावा, त्यांच्या बदल्या व शिफ्ट बदल्याची पद्धत बंद करावी, कर्मचाऱ्यांना पगाराची पावती मिळावी, महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी, कायम स्वरूपी कामगारांना पदोन्नतीसाठी मागील वेतन फरक देण्यात यावा. महिला कर्मचाऱ्यांना कामावरून प्रवासाची व्यवस्था व्हावी, कामगारांना सन्मानाने वागणूक मिळावी, अशा अशा विविध मागण्या यावेळी संघाकडून करण्यात आल्या. यावेळी संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सचिव एस के पळसे, संघटक विशाल बागुल, वैशाली कुलकर्णी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.