Pune News | सोसायटीत पहाटे भीषण आग ; ४६ रहिवासी सुखरूप बाहेर काढले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गुरुवार पेठेतील सोसायटीत पहाटे आग लागून तळमजल्यावरील वीज मीटर, तसेच दुचाकींनी पेट घेतल्याने सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सोसायटीतील ४६ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.गुरुवार पेठेत झेबा शेल्टर्स सोसायटीतील तळमजल्यावर बुधवारी (३ सप्टेंबर) पहाटे वीज मीटर, तसेच दुचाकींनी पेट घेतला. सोसायटीतील रहिवासी गाढ झोपेत होते.
तळमजल्यावर दुचाकी, वीज मीटरला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. आग भडकल्याने रहिवासी घाबरले. त्यांनी याची माहिती अग्निशमन दलास दिल्यावर जवानांनी पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अतुल मोहिते, अजिम शेख, सुधीर नवले, तेजस पटेल, सागर शिर्के, यश वीरकर यांनी आग आटोक्यात आणली.




