प्रभात वृत्तसेवा पुणे – दिवाळीत शहरातील विविध पाेलीस ठाण्यांमधील १७ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची वाहतूक शाखेत, मुंढवा ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांची बदली गुन्हे शाखेत झाली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुनील पंधरकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत, विशेष शाखेतील (स्पेशल ब्रँच) पोलीस रीक्षक विजय टिकोळे यांची वाहतूक शाखेत, नियंत्रण कक्षातील निरीक्षक अजय संकेश्वरी यांची आर्थिक गुन्हे शाखेत, नियंत्रण कक्षातील निरीक्षक संतोष सोनवणे यांची पोलीस निरीक्षक गुन्हे म्हणून बदली झाली आहे. विशेष शाखेतील निरीक्षक संदिपान पवार यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.अरुण हजारे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, गुरुदत्त माेरे यांची नांदेड सिटी ठाण्यातून विशेष शाखेत, विश्रांतवाडी ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची गुन्हे शाखेत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंजुम बागवान यांची येरवडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, मंगेश हांडे यांची विश्रांतवाडी ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती झाली. गुन्हे शाखेतील निरीक्षक स्मिता वासनिक यांची मुंढवा ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, गुन्हे शाखेतील निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची वानवडी ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, गुन्हे शाखेतील निरीक्षक कुमार घाडगे यांची कोंढवा ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी, आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप कसबे यांची विश्रामबाग ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली.बंडगार्डन ठाण्यात तात्पुरत्या स्वरुपात वरिष्ठ निरीक्षकपदी संतोष पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, ती नियमित झाली आहे.