Pune News | वाहतूक मार्गांत मोठे बदल ; गणेश विसर्जन मिरवणूक काळात ‘हे’ रस्ते टाळा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरात शनिवारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सकाळी ९:०० पासून मिरवणूक संपेपर्यंत १५ पेक्षा अधिक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पर्याय म्हणून विशेष रिंगरोड व पर्यायी व्यवस्था लागू केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहर पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व रस्त्यांवर नो-पार्किंग लागू असेल तसेच ६ सप्टेंबर मध्यरात्रीपासून ते ७ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल.
बंद राहणारे प्रमुख रस्ते..
लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, कर्वे रस्ता, सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभात रोड यांसह शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. हे रस्ते ६ सप्टेंबरला सकाळपासून ते ७ सप्टेंबरला मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील.
पर्यायी मार्ग व रिंगरोड व्यवस्था..
झाशी राणी चौक, गाडगीळ पुतळा, सेव्हन लव्हज चौक, व्होल्गा चौक, नळस्टॉप आदी ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गासाठी नळस्टॉप–लॉ कॉलेज रोड–सेनापती बापट रोड–संचेती हॉस्पिटल चौक–मालधक्का चौक–सेव्हन लव्हज चौक–मार्केटयार्ड–मित्रमंडळ चौक–नळस्टॉप असा रिंगरोड वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पार्किंगची ठिकाणे..
शिवाजी आखाडा, एआयएसएसपीएमएस मैदान, एस.पी. कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मराठवाडा कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, दांडेकर पूल–गणेशमळा परिसरात दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगची सोय उपलब्ध केली आहे.
“गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्ग व पार्किंग ठिकाणे वापरावीत आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.”
– हिंमत जाधव, उपआयुक्त, वाहतूक शाखा





