पुणे – गणेशोत्सवाला यावर्षीपासून “राज्य महोत्सवा”चा दर्जा मिळाला असून तो “महागणेशोत्सव” म्हणून साजरा होत आहे. या अनोख्या उत्सवाचे वैभव गुरुवारी (दि. २८) पोलीस मुख्यालयात रंगलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांतून खुलून आले. साऊंड–लाईट शोने सजलेल्या दालनात डॉग शोतील प्रशिक्षित श्वानांची चपळ खेळी, पोलीस बॅण्डचे सुरेल सूर आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस कुटुंबिय आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने मुख्यालयात ‘मिशन परिवर्तन’ तर्फे गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्यांचे प्रदर्शन आणि शिवकालीन शस्त्रांचे दर्शन घडविण्यात आले. विविध उपक्रमांतून पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा संदेश देत भाविकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. पोलीस दलाच्या सादरीकरणात उमटलेला उत्साह आणि कुटुंबियांच्या आनंदमिश्रित उपस्थितीमुळे पोलीस मुख्यालयाचा परिसर उत्सवाच्या रंगांनी उजळून गेला.