Pune News : पुण्यातील हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन
एफडीएची ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत कारवाई

पुणे : सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवर कठोर कारवाई केली आहे.
शिवाजीनगर येथील फर्ग्युसन कॉलेज (एफ.सी.) रोडवरील या दोन्ही आस्थापनांच्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी हॉटेल वैशालीची तपासणी केली. या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याने आस्थापनेचा निकाल ‘नॉन-कम्प्लायन्स’ (नियमांचे पालन न करणारे) असा नोंदविण्यात आला.
हॉटेल वैशालीच्या स्वयंपाकघरात अत्यंत अपुरी जागा
हॉटेल वैशालीच्या स्वयंपाकघरात अत्यंत अपुरी जागा असल्याचे तपासणीत समोर आले. कच्चा माल साठविण्यासाठी असलेले फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी लगत ठेवण्यात आले होते. तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी ठेवण्यात आला होता.
धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार अन्नपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. इडली आणि डोशाचे बॅटर तयार करण्याची प्रक्रियाही उघड्या व असुरक्षित जागेत सुरू होती.
कच्च्या कापलेल्या भाज्या थेट तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अन्नपदार्थांचे क्रॉस-कंटॅमिनेशन होण्याचा धोका निर्माण झाला होता.
याशिवाय स्वयंपाकघराला कीटकप्रतिबंधक दरवाजे नव्हते. अन्नपदार्थांच्या तापमानाच्या नोंदी तसेच पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत चाचणी अहवाल उपलब्ध नव्हता. तपासणीच्या वेळी वैध प्रशिक्षित पर्यवेक्षकही उपस्थित नव्हता.
जून २०२६ मध्येही झाली तपासणी
यापूर्वी जून २०२६ मध्ये तपासणी करून सुधारणा करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांनी हॉटेल वैशालीचा परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, एफ.सी. रोडवरील रूपाली रेस्टॉरंट येथेही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी या आस्थापनेची तपासणी केली. सुनावणीनंतर त्याच दिवशी परवाना निलंबित करण्याचे आदेश पारित करण्यात आले.
या रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित होते. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटकांचा प्रवेश होण्याचा धोका होता. परिसरात पाणी साचलेले होते.
साफसफाई अपुरी असून कचऱ्याचेही योग्य व्यवस्थापन केले जात नव्हते. कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. तसेच त्यावर आवश्यक लेबलिंग आणि ‘यूज बाय’ तारखांचाही उल्लेख नव्हता.
कच्चे आणि तयार अन्नपदार्थ स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था नव्हती. अन्नपदार्थांच्या तापमान नियंत्रणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. याशिवाय अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा आराखडा, प्रमाणित कार्यपद्धती आणि प्रशिक्षणाच्या नोंदींचाही अभाव आढळून आला. या गंभीर त्रुटींमुळे रूपाली रेस्टॉरंटचा परवानाही निलंबित करण्यात आला.
अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करणे आवश्यक
सह आयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित दोन्ही आस्थापनांनी सर्व गंभीर त्रुटींचे पूर्णपणे निराकरण करून पूर्नतपासणीत अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
तसेच प्रशासनाकडून लेखी परवानगी मिळेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करता येणार नाही. यामध्ये अन्नपदार्थांची विक्री, पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी यांचाही समावेश असून, या सर्व सेवांवर सक्त मनाई करण्यात आली आहे.
Stress Management: सतत टेन्शन घेण्याची सवय पडेल महागात! शरीरातील ‘या’ ३ अवयवांवर होतो परिणाम





