Pune News | एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अंतिम संधी ; या तारखेनंतर होणार थेट कारवाई

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा अडीच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. वाहनचालकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, १ डिसेंबरनंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांवर वायूवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.
राज्यात २०१९ च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे. पुण्यात २६ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम दिले आहे. मात्र, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबरप्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी लागणारा कालावधी जास्त आहे. आत्तापर्यंत केवळ पावणेआठ लाख चालकांनी नोंदणी केली असून, त्यातील साडेपाच लाख चालकांनीच नंबरप्लेट बसवून घेतली आहे.
अजूनही १९ लाख वाहनांनी नोंदणी अर्ज दाखल करणे बाकी आहे, तसेच ज्यांना नंबर प्लेट बसविण्याची तारीख दिली, तीही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची आहे.त्यामुळे एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी, याबाबत सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारी (दि. १४) परिवहन विभागाने ३० नोव्हेंबरपर्यंत नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊन याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
मुदतवाढ का?
अनेक जुन्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बाकी
– अनेक वाहनांना सप्टेंबर महिन्यातील अपाॅइंटमेंट
– ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास उशीर
– काही फिटमेंट केंद्रे बंद पडल्याचे आढळले
– नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी





