Pune News | पुण्यात दस्त नोंदणीला उधाण ; एका दिवसात 1,500 दस्तांची नोंदणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सलग तीन दिवस सुट्य़ा आणि त्यानंतर सुरू होणारा पितृ पंधरवडा यामुळे नागरिकांनी सदनिका, दुकाने आणि जमिनी यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी केली होती. पर्यायाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांची वेळ दिड तासांनी वाढविण्यात आली. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची सोय झाली. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात दस्त नोंदणीचा मुहुर्तही नागरिकांनी साधला.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 27 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दिवसाला सरासरी 1 हजार 200 दस्त नोंदविले जातात. मात्र, गुरूवारी दुपारपर्यतच एक हजारांपेक्षा अधिक दस्त नोंदविले गेले असून रात्रीपर्यंत सुमारे 1 हजार 500 दस्त नोंदविले गेल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकार्यांनी दिली.शुक्रवारी (दि.5) ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. तर, शनिवारी (दि.6) अनंत चतुर्दशीची सुट्टी त्यानंतर रविवार (दि.7) यामुळे शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी आहे.
तसेच, सोमवारपासून (दि.8) पितृ पंधरवडा सुरू होत आहे. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविण्यासाठी सकाळपासूनच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती. पितृ पंधरवड्यापूर्वीच दस्त नोंदणीचे व्यवहार पूर्ण करण्याची अनेकांची इच्छा असते यामुळेच गुरुवारी सर्व कार्यालयांत गर्दी झाली होती. यामुळे सहा वाजेपर्यंतची वेळ दुय्यम निंबधकांनी दिड तासांची अधिक वेळ सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून वाढवून घेतली होती.





