Pune News : खराडी–शिवणे रस्त्याला गती ? अतिरिक्त आयुक्तांनी केली रस्त्याची पहाणी

पुणे : वडगावशेरीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, नगर रस्त्यावर तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. विशेषतः गेल्या तेरा वर्षांपासून रखडलेल्या खराडी–शिवणे नदीपात्रातील रस्त्याच्या कामाची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांसह केली. यावेळी या परिसरातील सामाजिक कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
१३ वर्षांपासून रखडलेले काम
खराडी–शिवणे रस्त्याचे काम तब्बल १३ वर्षांपासून रखडले असून, आतापर्यंत केवळ ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के भूसंपादनासाठी जागा मालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या रस्त्याचा तिसरा टप्पा म्हणजे खराडी ते संगमवाडी हा ११.५ किमीचा असून, त्यातील सुमारे ६ किमी परिसरातील भूसंपादन पूर्ण झाले आहे.
खराडी गाव ते मुंढवा पूलदरम्यानचा रस्ता पूर्ण होऊन सध्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र संगमवाडी ते गुंजन चौक (४ किमी), गुंजन चौकातील ५०० मीटर आणि वडगावशेरी–खराडी दरम्यानच्या १ किमी रस्त्यासाठीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. त्यामुळे नदीपात्रात प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यास या मार्गावरचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे या कामाला प्राधान्य देत प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेतले आहे.
नगर रस्त्यासह खराडी-शिवणे रस्त्याची पाहणी केली, हा रस्ता अर्धवट पडून आहे. या रस्त्यासाठी पाच ठिकाणांवरील भूसंपादन करणे आवश्यक आहे. या रस्त्याचे काम मार्घी लागवण्यासाठी जागा मालकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांना मोबादला कोणत्या स्वरुपात हवा आहे, हे जाणून घेतले जाईल. भुसंपादनाला वेग दिला जाऊन या रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.
– ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.




