Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती ; 470 कोटींचा निधी मंजूर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळणार आहे. या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी महापालिकेकडून तब्बल ४७० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
कात्रज-कोंढवा रस्त्याला ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली. सुरूवातीला या रस्त्याची रुंदी ८४ मीटर ठेवण्यात आली होती. मात्र, भूसंपादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने ती ५० मीटर करण्यात आली. राज्य सरकारकडून मिळालेला १४० कोटी रुपयांचा निधी जागा मालकांना वाटप केला जाणार आहे.
सध्या, काही भागांमध्ये भूसंपादन पूर्ण होऊन रस्त्याचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध झाली आहे, तेथे रस्ता बांधण्यात आला आहे. काही प्रमाणात भूसंपादन टीडीआरद्वारेही पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता सध्या तुकड्या-तुकड्यांतून तयार झालेला दिसतो. मात्र, संपूर्ण काम आवश्यक जागेच्या भूसंपादनाअभावी रखडले आहे.
५० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी एकूण ९४ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन आवश्यक असून, त्यापैकी ४६ हजार ४५६ चौरस मीटरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. पालिकेच्या २०२५-२६च्या अंदाजपत्रकात या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.





