Pune news : जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन क्रीडा स्पर्धांनी उत्साहात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करत ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ या भावनेतून देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यावर सातत्याने भर दिला आहे

Pune news : बुद्धिबळातील डावपेच, कॅरममधील अचूक नेम, टेबल टेनिसमधील चुरशीच्या लढती आणि बॅडमिंटनमधील वेगवान खेळ अशा क्रीडामय वातावरणात कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटरचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वयोगटांतील सभासद आणि क्रीडाप्रेमींनी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने दिवसभर क्लबमध्ये क्रीडा उत्साह पाहायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करत ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ या भावनेतून देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यावर सातत्याने भर दिला आहे. खेळातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते.
हाच दृष्टिकोन पुढे नेत जयराज क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात क्रिसिल शहा व क्रिशांग शहा, तर १८ वर्षांवरील गटात प्रकाश ओसवाल व रणजीत शहा यांनी बाजी मारली. कॅरममध्ये १८ वर्षांखालील गटात हृदान व विहान मेहेर, तर १८ वर्षांवरील गटात मयूर मेहेर व सौरभ शहा विजेते ठरले.
टेबल टेनिस स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात अर्थ रुणवाल व आदिव शाह, १८ वर्षांवरील गटात अनुप मेहेर व प्रितेश मेहता, तर ६० वर्षांवरील गटात विलास शहा व रणजीत शहा यांनी विजेतेपद पटकावले. बॅडमिंटनच्या पुरुष विभागातील विविध वयोगटांत अर्णव शहा, लॅव्हन पटेल, अर्थ रुणवाल, रिदान प्रथम पारेख, तुषार राठोड, व्रजेश शहा आणि राजेश पारेख यांनी विजेतेपद मिळविले. महिला विभागात प्रियाल शहा, पूजा गांधी आणि स्नेहल शहा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील कामगिरीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उत्साह आणि सहभागाचाही विशेष गौरव करण्यात आला. स्मित संघवी यांना ‘बेस्ट स्पोर्टिंग अवॉर्ड’, हसमुख पटेल यांना ‘सीनियर स्टार अवॉर्ड’, तर माहित शहा यांना ‘यंगेस्ट पार्टिसिपेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, सेक्रेटरी राजेंद्र शहा तसेच ट्रस्टी दिलीप मेहता आणि पंकज डेडिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धांमुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभासदांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढविणे, नियमित खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि खिलाडूवृत्ती दृढ करण्याचा उद्देशही या उपक्रमातून साध्य झाला.
– राजेश शहा, मॅनेजिंग ट्रस्टी, पूना गुजराती बंधू समाज





