प्रभात वृत्तसेवा पुणे – मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील आठवाड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा मान्सूनपूर्व झालेल्या धुव्वाधार पाऊस झाला. त्यानंतर मान्सून राज्यात दाखल झाला आणि आठवडाभर मध्यम ते जोरदार बरसल्यावर पावसाने विश्रांती घेतली. मागील तीन महिन्यात खंड पडत पाऊस कमी-अधिक झाला. सप्टेंबर महिन्यातही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आल्या. आता मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ११ सप्टेंबररोजी राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने त्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुढील चार ते पाच दिवसात राज्यात चांगला पावसाला सुरवात होईल. परतीचा मान्सून १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता परतीचा पाऊस शेतीसाठी पुरक राहणार की नुकसान करणार हे तीव्रतेवर अवलंबून असेल. पाणीसाठा वाढण्यासाठी हा पाऊस फायद्याचा असून, राज्यातील अजूनही काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे हे जिल्हे परतीच्या पावसावर अवलंबून असून, कृपादृष्टी होणार का हे पावसाच्या प्रवासावरून दिसून येईल.