Pune News : वाघोलीत पायाभूत सुविधांचा बोजवारा! महापालिका आयुक्तांनीच दिली कबुली

प्रभात वृत्तसेवा
पुणे : वाघोली परिसरात पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन्स, कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांची अपूरी सुविधा आहे. त्यामुळे, नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची कबूली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीच दिली आहे.तसेच या भागात आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत पीएमआरडीएने (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी भूमिका महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केली आहे.
यासंदर्भात शासनाला पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्तांनी बुधवारी वाघोली परिसराची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी परिसरातील मूलभूत समस्यांबाबत तक्रारी मांडल्या. मागील काही वर्षांत वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली असून, महापालिकेत समावेश होण्यापूर्वीपासूनच पीएमआरडीएने परवानग्या दिल्या आहेत. तथापि, या बांधकामांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पीएमआरडीएकडून नीटपणे पार पडलेली नाही, असे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.
आयुक्त म्हणाले की, पीएमआरडीएने मोठ्या सोसायट्यांना परवानगी देताना ड्रेनेज लाईनऐवजी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) उभारणे बंधनकारक केले असले तरी, या केंद्रांतील पाण्याचा पुनर्वापर आणि शिल्लक पाण्याच्या व्यवस्थापनाचे कोणतेही ठोस नियोजन नसल्याने अनेक सोसायट्या प्रक्रिया केलेले पाणी मोकळ्या जागेत सोडत आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
नागरीकरणाच्या तुलनेत रस्ते, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठीची यंत्रणा अपुरी असल्याने परिसरात कचर्याचे ढीग, अस्वच्छता आणि विद्रुपीकरण वाढले आहे. पाहणीदरम्यान नागरिकांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचेही आयुक्तांनी मान्य केले. पाणी, ड्रेनेज आणि रस्ते यांची व्यवस्था होईपर्यंत पीएमआरडीएने वाघोलीत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असे शासनाला तसेच पीएमआरडीएला कळविण्यात येईल.





