Pune News : जीएसटी कपातीमुळे वाहन खरेदीत वाढ! दसऱ्याच्या मुहूर्तावर एका आठवड्यात पुणेकरांनी केली इतक्या वाहनांची खरेदी..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दसऱ्याच्या मुहुर्तावर सोन्यारोबर वाहन खरेदीही केली जाते. नेहमीप्रमाणे पुणेकरांनी यंदाही वाहनखरेदीस पसंती दर्शवल आहे. यंदा आतापर्यंत जवळपास ९ हजार ५३१ वाहनांची नोंदी झाली असून त्यात ८१४ इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश आहे. जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्याने चारचाकी वाहन खरेदीची संख्या वाढली असून, दसऱ्यापर्यंत खरेदी १० हजारांवर पोहचेल.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला नागरिकांकडून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अन्य वाहन खरेदीला पसंती असते. यावर्षी २१ ते २९ सप्टेंबरदरम्यान ९ हजार ५३१ वाहनांची खरेदी नोंदणी झाली. सर्वाधिक ६ हजार ११७ दुचाकींची खरेदी झाली असून त्यात ६७९ इलेट्रीक दुचाकीचा समावेश आहे. २ हजार ६७० चारचाकींची खरेदी झाल्याची नोंद असून, त्यामध्ये ११६ इलेक्ट्रीक वाहने असल्याची माहिती पुणे आरटीओ कार्यालयाने दिली.
दसऱ्याच्या पुर्वसंध्येला किंवा दसऱ्याच्या दिवशी वाहने घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूम मध्ये गर्दी वाढलेली दिसते. वाहनाची नोंदणी वेळेत होऊन ताब्यात मिळावी, यासाठी पुणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अथक परिश्रम घेत आहे.
वाहन खरेदी (इलेक्ट्रिक वाहने सोडून)
वाहनप्रकार – वाहन संख्या
दुचाकी – ५,४३८
2) कार – २,५५४
3) रिक्षा – ६९
4) गुड्स – २६१
5) बस – १७
6) टुरिस्ट टॅक्सी – १९१
7) इतर वाहने – ८७
८१४ इलेक्ट्रीक वाहने ..
दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात ८१४ ई-वाहनांची खरेदी नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकी ६७९, कार ११६, गुड्स वाहने ७, टॅक्सी ८, ऑटोरिक्षा ४ या वाहनांचा समावेश आहे. मागील दोन वर्षात इलेक्ट्रीक वाहन खरेदी वाढताना दिसत आहे.
“दसऱ्याच्या मुहुर्तावर नागरिकांकडून वाहन खरेदी केली जात असून, यंदाही चांगला प्रतिसाद दिसून येते. त्याच्या नोंदणीचे काम कार्यालयाकडून सुरू आहे. पुणेकरांना दसऱ्याच्या मुहुर्तावरच ही वाहने घरी घेऊन जाता यावीत, याकरिता लवकरात लवकर वाहनांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.”
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





