Pune News | वाहतूक नियमांची बेफिकिरी पडणार महागात ; फोटोसकट दंड थेट मोबाईलवर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता आरटीओची एआय कॅमेरे आधारित रडार प्रणाली करडी नजर ठेवणार आहे. ही प्रणाली आरटीओच्या वाहनांवर बसविली असून शहर, जिल्ह्यासह महामार्गावर तिचा फेरा असेल. त्यामुळे तुम्ही नियम मोडताच त्वरीत फोटोसह दंडाची पावती रडार प्रणालीतून तुमच्या हाती पडणार आहे.
वाहतूक नियम आणि कोंडीबद्दल पुण्याची सर्वत्र ख्याती आहे. नियमभंगामुळे शहर, जिल्हा, महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. महामार्गावर ओव्हरस्पिडींग, विना सीटबेल्ट, विना हेल्मेट वाहन चालविणे, लेन कटींग यासह अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते. शहरात याच नियमांचे पालन होत नसल्याने अपघातासह वाहतुक कोंडी होते.
काय आहे प्रणाली..
वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी एआय कॅमेरे आधरित असलेली रडार प्रणाली आरटीओ वाहनांवर बसविली आहे. पूर्वी महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवर कारवाई करताना गाडीतील कॅमेरा कर्मचारी हाताळत होते. आता कर्मचारी नसताना एआय कॅमेरा आधारित रडार प्रणाली सेकंदात नियम तोडणाऱ्याचा फोटो काढणार आहे.
त्यामध्ये नियम मोडल्याचा प्रकार, वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ आणि त्यासाठीचा दंड याची सर्व माहिती फोटोवर येणार असून, तात्काळ मोबाईलवर दंडाची पावती पोहचणार आहे.तसेच याचे चित्रिकरणही होणार असून बॅकअप आरटीओ कार्यालयातही असणार आहे.
महत्वाचे…
– एआय कॅमेरा रडार प्रणाली (एमटीईएस इंटरसेप्टर)
– तासात ४०० हून अधिक फोटो काढण्याची क्षमता
– रडार प्रणालीचा पल्ला शंभर मिटरपर्यंत
– थांबून तसेच चालत्या गाडीतूनही ही प्रणाली काम करणार
-ओव्हरस्पीड, विना हेल्मेट, सीटबेल्ट, नंबरप्लेट नसणे, लेन कटींगसह अन्य नियम मोडणाऱ्यांवर लक्ष
– नियम मोडणाऱ्या ठिकाणी वाहने तैनात
“पुणे प्रादेशिक परिवहन विभागा चार वाहनांवर ही प्रणाली बसविली आहे. त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शहरासह तालुक्याच्या ठिकाणी नियम मोडल्यामुळे होणारी वाहतुक कोंडी, अपघात कमी व्हावे आणि नियम मोडणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी प्रणाली नक्कीच उपयोगी ठरेल.”
-स्वप्निल भोसले – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे आरटीओ





