प्रभात वृत्तसेवा पुणे – औषधी वनस्पतींवर आधारित नाविन्यपूर्ण, दर्जेदार आणि भेसळमुक्त उत्पादने विकसित केल्यास स्वयंरोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. वाढती जागतिक बाजारपेठ पाहता ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी उत्पादनांची शुद्धता आणि गुणवत्ता राखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत क्षेत्रीय सह-सुविधा केंद्राच्या (पश्चिम विभाग) वतीने विद्यापीठात ‘औषधी वनस्पतींपासून नाविन्यपूर्ण उत्पादने व विकास’ या विषयावर दोन दिवसीय प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. काळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय नाईक यांनी औषधी उत्पादनांच्या पेटंट प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत २० प्रशिक्षणार्थी, शेतकरी आणि नवउद्योजकांनी सहभाग घेतला. दोन दिवसांच्या तांत्रिक सत्रांमध्ये अभ्यंग तेल, शतावरी तेल, अडुळसा सिरप, अर्जुनारिष्ट यांसारख्या औषधी अर्कांसह हर्बल ज्युस, जॅम, लाडू, बिस्किटे आणि सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, फेस वॉश, शाम्पू) तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. वैद्य मंदार अक्कलकोटकर, डॉ. स्वप्निल शिंदे आणि इतर तज्ज्ञांनी आयुर्वेदातील तांत्रिक प्रक्रियांवर आधारित मार्गदर्शन केले. केंद्राचे प्रमुख संशोधक प्रा. डॉ. दिगंबर मोकाट यांनी प्रास्ताविक केले.