Pune News | पंचनामे झाल्यावरच मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील १४ लाख एकर जमिनीवरील पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला म्हणून मदत देता येत नाही. मदत द्यायची एक विशिष्ट पद्धत असते. याउलट मागणी न करता शासनाने मदतीसाठी पाऊल उचलल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बाणेरच्या बंटारा भवनातील एमकेसीएलच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी अतिवृष्टीबाबत परिस्थितीवर विचारल्यावर ते म्हणाले, राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यासाठी सज्ज आहेत. इशारा पातळीच्या वर गेलेल्या धरणातील विसर्ग वाढवायचा की नाही, याबाबत शेजारील राज्यांकडून सहकार्य मिळत आहे.
ठाकरे ब्रॅण्डला नाकारले..
बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रॅण्डला मतदारांनी नाकारल्याचे सांगून ते म्हणाले, की या निवडणुकीचे राजकारण होऊ नये, अशी माझी भूमिका होती. आमच्या पक्षातील काही नेते निवडणूक लढवित असले, तरी आम्ही कधीही याला राजकीय रंग दिला नाही. मात्र, विरोधकांनी ठाकरे ब्रॅण्डचा प्रचार करून राजकीय रंग दिला. त्यांना रिजेक्ट केले.
पुणेकर, पोलीस प्रश्न सोडवतील..
पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीवरून वाद सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले, की पुण्यात दरवर्षी असे प्रश्न निर्माण होत असतात. पुणेकर आणि पोलीस प्रशासन मिळून हे प्रश्न सोडवतील. आजवर मुख्यमंत्र्यांना अशा प्रश्नात लक्ष घालावे लागले नाही, पुढेही लक्ष घालण्याची गरज नाही.





