Pune News | घाट विभागात धो-धो पाऊस ; ताम्हिणी घाटमाथ्यावर २१० मिमी पाऊस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दहीहंडीपासून शहर परिसरात मध्यम हजेरी लावलेल्या पावसाने रविवारी हलक्या सरीने हजेरी लावली. शहर, उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडत होत्या. सायंकाळनंतर हडपसर, मगरपट्टा, वाघोली यासह अहिल्यानगर रोड, सोलापूर रोड आणि सासवड रोडवर ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. दरम्यान, पुढील दोन दिवस शहर, जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील, पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून पुणे जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी दोनशेपार पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यावर १५ ते ३० मिमी पाऊस पडत होता. गेल्या ४८ तासात घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर घाटविभागात जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासात ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद झाली.
सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात १७४ मिमी पावसाची नोंद झाली. अंबवने घाटमाथ्यावर ११५, लोणावळा परिसरात ५५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांसाठी घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
ताम्हिणी घाटात २१० मिमी..
जिल्ह्यातील घाटमाथ्यासह डोंगराळ भागात गेल्या २४ तासात धुव्वाधार पाऊस झाला. ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद झाली. दावडी येथे ११०, डुंगरवाडीला १६५ तर शिरगाव घाटमाथ्यावर १२० मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांसाठी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट दिला आहे.




