pune news: सात दिवसांनंतर गारठा वाढणार!

पुणे : ढगाळ हवामानामुळे राज्यात सध्या किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र पुढील सात दिवसांत पुन्हा गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून, गुरुवारी शहरात 17.3 अंश सेल्सिअस किमान आणि 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता. सर्वत्र किमान तापमान सारसरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटले होते. मात्र, बंगालच्या उपसागरात आणि पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने केरळ, कर्नाटकसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली.
राज्यात प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमान सरासरीपुढे जाऊन थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात कमी दाबचे क्षेत्र तयार झाले असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्यातील हवामानावर होणार आहे. राज्यात 22 ते 23 डिसेंबरपर्यंत किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढणार आहे.
गुरुवारी (दि. 15 डिसेंबर) महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात इतर भागांतही तापमान सरासरीच्या वर नोंदवले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आदी भागांत हलका गारवा आहे.





