प्रभात वृत्तसेवा पुणे – सार्वजनिक वाहतूक सेवेची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएलला बस स्थानके आणि बस पार्क करण्यासाठी महापालिकेच्या जागा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी माजी आमदार व काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.सुमारे १ लाख ४३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागा महामेट्रोला देण्याचा घाट असल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेची जागा परस्पर महामेट्रोला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले. पीएमपीएमएलच्या बस ताफ्यात नजीकच्या काळात १२०० गाड्यांची भर पडणार असून, बस स्थानके आणि रात्रीच्या वेळी बस पार्किंग यासाठी जागा लागणार आहे.पीएमपीच्या सार्वजनिक बससेवेचा लाभ दररोज ११ लाख प्रवासी घेत असतात. अशा या महत्त्वाच्या बससेवेसाठी प्राधान्याने जागा देण्यात यावी.प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या वेळी सुनील मलके, अविनाश बागवे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, ॲड. प्रवीण करपे, ॲड. साहिल राऊत, विनोद रणपिसे, मिलिंद पोकळे, अमोल धर्मावत, ॲड. विजय त्रिकोणे, विकास सुपनार, मेधशाम धर्मावत, सुनील बावकर, हुसेन शेख, दयानंद आडागळे, गोपाळ धनगर आदी उपस्थित होते.