Pune News : गर्लफ्रेंडला रबडी खायला दिली अन्… बॉयफ्रेंडचा भयानक कांड समोर

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गर्लफ्रेंडला रबडीमधून गर्भपाताची गोळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारिरिक संबंध ठेवले, यातून तरुणी गर्भवती राहिली. या घटनेमुळे तरुण घाबरला त्याने एक प्लॅन तयार केला. या तरुणीचा तिच्या नकळत गर्भपात घडवून आणला.
तरूणाने नेमके काय केले?
बॉयफ्रेंड एक दिवस त्याच्या गर्लफ्रेंडसाठी रबडी घेऊन आला, पण या रबडीमध्ये त्याने गर्भपाताची गोळी टाकली होती. बॉयफ्रेंडने रबडीमध्ये गर्भपाताची गोळी टाकली आहे, हे गर्लफ्रेंडला माहिती नव्हतं, त्यामुळे तिने रबडी खाल्ली आणि तिचा गर्भपात झाला. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आदर्श वाल्मीक मेश्राम याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पीडित तरुणीने सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आदर्श मेश्रामने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, त्यातून ती गर्भवती राहिली. गर्भधारणा समजताच आदर्शने तिच्या नकळत आणि संमतीशिवाय रबडीत गर्भपाताची गोळी मिसळून तिला खाऊ घातली, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. यानंतर आदर्शने लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.





