Pune News : गावरान हापूसला पाच वर्षातील उच्चांकी भाव; किलोला मिळाला २०१ रुपये भाव

पुणे : गोड चवीच्या, गर आणि रस जास्त असलेल्या गावरान हापूसची सध्या बाजारात चलती आहे. रत्नागिरी हापूसचा संपलेला हंगाम आणि कर्नाटक येथून होणारी तुरळक आवक, या पार्श्वभूमीवर गावरान हापूसला मागणी वाढली आहे.
परिणामी, पाच वर्षातील उच्चांकी भाव मिळाला आहे. मंगळवारी (दि. ११) झालेल्या लिलावात किलोला २०१ रुपये भाव मिळाल्याचे मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील फळ विभागात मंगळवारी गावरान आंब्याची ८० ते ९० टन आवक झाली. हवेली, भोर, मुळशी, वेल्हा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भाग आणि सातारा जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात गावरान हापूसला किलोला सरासरी ९० ते १२० रुपये भाव मिळत आहे.
मात्र, हवेली तालुक्यातील मांडवी येथील शेतकरी शंकर पायगुडे आणि रोहिदास गोगावले यांच्या आंब्याला सर्वाधिक २०१ रुपये प्र्तिकिलो भाव मिळाला. केशरला ८० ते १२५ रुपये, पायरीला ३० ते ६० रुपये आणि राजापूरीला ३० ते ४५ रुपये मिळाला.
कोकण आणि कर्नाटक आंबा तर मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मात्र, गावरान हापूसह विविध प्रकारचे आंबे खाणाराही वर्ग आहे. त्यांच्याकडून सध्या आंब्याला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.





