Pune News | गणपती विसर्जन मिरवणुकीचा प्रश्न चर्चेने सोडवणार – आशिष शेलार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चेने मार्ग काढू, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिले, तसेच सर्वच गणेश मंडळांचा सन्मान ठेवण्यात येईल, असेही शेलार यांनी या वेळी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर ऍड. शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहरातील काही गणेश मंडळांनी मानाच्या गणपतीच्या आधी सकाळी सात वाजताच विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात विचारले असता शेलार यांनी सांगितले, की आजच्या बैठकीत हा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. यावर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले आहे. यासंदर्भात चर्चेतून मार्ग काढला जाईल, असा विश्वासही ऍड. शेलार यांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीत शंशाक राव आणि प्रसाद लाड यांच्या पॅनेलला मिळालेल्या यशाबद्दल विचारले असता ऍड. शेलार यांनी सांगितले, की भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती. बेस्टवर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने राजकारण केले. याच फळ त्यांना मिळाले आणि हाती भोपळा आला, अशी टीकाही ऍड. शेलार यांनी केली. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या स्टार प्रचारकांची यादी लवकरच जाहीर होईल, असे सांगतानाच स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांनी नावे ऍड. शेलार यांनी बुधवारीच जाहीर केली.





