Pune News | गणेशोत्सव संपला, पण मंडप तसेच! ; पुणेकर त्रस्त, महापालिकेकडून कारवाईला विलंब

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सवाची धामधूम संपून चार दिवस उलटून गेले तरी अनेक मंडळांचे मंडप तसेच रस्त्यावर असल्याचे चित्र शहरात आहे. उत्सवात वाहतूक कोंडी होत होती, ते नागरिकांनी सहन केले. मात्र, आता उत्सव संपूनही ही मंडळे मंडप उतरवून घेत नसल्याने नागरिकांना अजूनही मन:स्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या दारासमोरील मंडळानेच अद्याप मंडप उतरवून घेतला नसून, महापालिका प्रशासनाला दारातलीच गोष्ट दिसत नाही, तर मग शहरभरात काय कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. त्यानंतर जवळपास तीन दिवस झाले आहेत, असे असताना अनेक मंडळांनी रस्त्यावरील मंडप अद्याप उतरून घेतलेले नाहीत. काहींनी ते उतरून घेतले परंतु त्याचे लोखंडी अॅंगल, बांबू त्याच ठिकाणी ठेवून दिले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मंडप बांधतानापासून ते उत्सव संपेपर्यंत वाहनचालक नागरिकांनी वाहतूक कोंडीचा सामना केला आहे. त्यामुळे होणारा मन:स्तापही सहन केला आहे. मात्र, आता उत्सवही संपला असे असताना आम्ही अजूनही तो सहन का करावा, असा सवाल स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
“मंडप काढून घेण्याबाबत मंडळांना सूचना दिल्या आहेत. आजच (गुरूवारी) या संबंधात बैठक झाली असून शुक्रवारपासून कारवाई सुरू करीत आहोत. ज्या मंडळांनी मंडप उतरवले आहेत. परंतु, साहित्य रस्त्यांवरच ठेवले आहे त्यांनाही ते उचलून नेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.”
– संदीप खलाटे, अतिक्रमण विभाग प्रमुख, पुणे महापालिका





