Pune News | महाज्योतीकडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग चालू करत असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज २० ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाला आर्थिक पाठबळ दिले जात आहे. यामुळे ग्रामीण, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी मिलते. प्रशिक्षण नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार असून प्रवेशासाठी उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे होईल.
ही योजना इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. महाज्योती मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजसेवा तसेच संयुक्त गट ब व क अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची माहिती, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रिया www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




