Pune news : विशेष मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन विशेष मुलीशी अश्लील चाळे, विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय तरूणाला न्यायालयाने दणका दिला आहे. ५ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही विशेष न्यायाधीश डी.के.अनुभुले यांनी आदेशात म्हटले आहे.
दीपक सुधीर मंडल (वय २८, मूळ. आसाम) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी ५ साक्षीदार तपासले.
पोलीस उपनिरीक्षक एस.ए.शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना हवालदार एस.ए.माने यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ७ अॉक्टॊबर २०२१ रोजी पीडित घराच्या ओट्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. तिला मिठी मारली.
अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केला. पीडित घरात पळून गेली. इशाऱ्यानेच घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. आईने बाहेर पाहिले असता आरोपी पळाला. पीडिताच्या वडिलांनी पाठलाग करून पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपीला ओळखले अन न्यायालयातच ती रडली पीडित लहानपणापासूनच विशेष मुलगी आहे. ती जास्त बोलत नाही. तिला इशाऱ्याची भाषा कळते.
ती इशाऱ्यानेच बोलते. तिने तपासात इशाऱ्यानेच घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. १६४ चा जबाब पण दिला होता. न्यायालयात तिने आरोपीला ओळखले. त्याने केलेले कृत्य इशाऱ्याने दाखवत ती रडली. या बाबी न्यायालयाने नोंदवून घेतल्या.





