Pune News | पुणे फेस्टिव्हलमध्ये प्रथमच ‘जुळ्यांचे संमेलन’; बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार अनोखा कार्यक्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – ३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा जुळ्यांचे संमेलन हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी पुणे आणि परिसरातील जुळ्यांच्या सहभागासाठी विनामूल्य नोंदणी करण्यात येत असून, [email protected] या वेबसाइटवर अधिक माहिती मिळेल, असे आवाहन पुणे फेस्टिव्हल संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.हे संमेलन दोन सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते तीन या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
या वेळी जुळी अपत्ये होण्याची वैद्यकीय मीमांसा या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान, जुळ्या अपत्यांची भविष्य भिन्न का असतात? या विषयावर ज्योतिषांचे विवेचन, जुळ्यांची आणि पालकांची निवडक मनोगते, जुळ्यांचे सत्कार, केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील कोडिन्ही या गावाला जगाची जुळ्यांची राजधानी असे संबोधले जाते.
त्या गावात सर्वाधिक जुळी जन्माला येतात. त्या कोडिन्ही गावाच्या प्रमुख प्रतिनिधींचा सत्कार आणि मनोगत, जुळ्यांवर आधारित राम और शाम, सीता और गीता, जुडवा, अंगूर, किशन कन्हैय्या, चालबाज या जुळ्यांवर आधारित चित्रपटांतील गाण्यांची चित्रफित, तसेच जुळ्यांवरील पुस्तकाचे प्रकाशन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.ज्या कुटुंबात जुळी अपत्ये आहेत; अथवा आपल्या परिचयातील कुटुंबांमध्ये जुळी असतील, तर कृपया त्यांची नावे आणि मोबाइल क्रमांक ईमेल वर पाठवावे, असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.





