चिमुकल्याच्या वाढदिवसी घराला आग; अग्निशमन जवानांकडून 6 जणांची सुखरूप सुटका

पुणे – चिमुकल्याचा वाढदिवसीच घराला लागलेल्या आगीतून अग्निशमन दलाकडून पाच महिला व चिमुकल्याची सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी कोंढवा खुर्द येतील भाग्योदयनगर येथे घडली. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कोंढवा खुर्द, भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक ३४ येथे दुकानामध्ये आग लागल्याची वर्दि मिळाली होती. तेथे तातडीने कोंढवा खुर्द व बुद्रुक येथून दोन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.
वाहने घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, जुन्या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या कपड्याच्या दोन दुकानामधून आग लागल्याचे दिसून येत होते. पाण्याचा मारा सुरु करत आग वरील मजल्यावर व इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
वरील मजल्यावर रहिवाशी असलेल्या पाच महिला व एक लहान मुलगा (३) यांना श्वसन यंत्र (बी ए सेट) परिधान करीत आग व धुरामधून बाहेर काढण्यात आले. पुढे सुमारे वीस मिनिटात आग पूर्ण विझवत पुढील धोका दूर केला गेला. आगीमध्ये कपडे, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, यंत्रसामुग्री इत्यादी जळाले असून मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये एका महिलेच्या पायाला व अग्नीशमन दलाचे जवान यांच्या हाताला किरकोळ स्वरूपात भाजले आहे.
बचाव करण्यात आलेल्या कुटूंबातील लहान मुलाचा वाढदिवस होता. त्याची अग्नीशमन दलाच्या जवानांनी केलेल्या सुखरुप सुटकेबद्दल स्थानिकांनी जवानांचे आभार मानत कौतुक केले. यावेळी वाहनचालक रविंद्र हिवरकर, सत्यम चौंखडे व जवान रफिक शेख, किशोर मोहिते, योगेश पिसाळ, सागर दळवी, निलेश वानखेडे, कुणाल खोडे, गोविंद गीते, हर्षल येवले, हर्षवर्धन खाडे यांनी सहभाग घेतला.





